सवाष्ण
सवाष्ण
लेखिका: डॉ. क्षमा गोवर्धने शेलार
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
या कादंबरी बाबत यापूर्वी जास्त काही वाचनात नाही आले. राजहंस च्या साईट वर पुस्तके पाहत असताना हे पुस्तक दिसले होते कथानक थोडेसे रहस्य/भय कथे सारखे वाटले म्हणून यंदा पुस्तक प्रदर्शनानंतर पुस्तक घरी आले.
पुस्तकाचे कथानक गावातील एक वाडा त्यातील सदस्य, वाड्याला असलेली भूतकाळातील घटनांची पार्श्वभूमी आणि त्याचे उमटणारे तरंग या भोवती फिरते. कथेतील गूढता टिकवण्यात लेखिकेला यश आले आहे. कथेतील पात्र खूप छान प्रकारे खुलवून मांडली आहेत त्यामुळे कांदबरी वाचताना पात्र समोर उभी राहतात.
काही पात्रे लक्षात राहून जातात जसे की दुर्गा आजी, तुळसा, रुक्मिणी, सखू.
या पात्रांची काळानुरूप होणारी मानसिक स्थित्यंतरे पण अगदी चपखल टिपली आहेत. त्यामुळे सुरवातीला खाष्ट, स्वार्थी वाटणारी दुर्गाआजी नकळत आपुलकी देणारी आणि घरासाठी चांगला विचार करणारी होऊन जाते. कथेतील गावातले प्रसंग, वाड्यातील लग्न, तत्कालीन समाजाने सवाष्ण म्हणून टाकलेल्या जबाबदाऱ्या याचे वर्णन व बारकावे पण छान जमून आले आहे.
काही ठिकाणी कथा रंगात येत असताना कथेला दिलेली कलाटणी किंवा भविष्यात घेतलेल्या उड्या जरा खटकल्या. कथा अजूनही मजबूत करायला संधी होती असे वाटून जाते. पण एकंदरीत पुस्तक छान व एकदा वाचता येऊ शकते असे आहे. गावातील काही चालीरीती व लग्नातील काही प्रसंग यातील बारकावे यासाठी पुन्हा वाचनात येऊ शकते. बाकी लेखिकेचे राजहंस प्रकाशन च्या स्पर्धेत विजयी झालेल्या कथेवर हे पुस्तक आहे. आणि ज्या पद्धतीने पात्रे वा कथा फुलवली आहे व बारकावे टिपले आहे त्यावरून ही निवड सार्थ आहे व तुंबाडचे खोत या कादंबरीची आठवून करून देणारी आहे.
Comments
Post a Comment