राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान
राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान
लेखक: हमीद दलवाई
प्रकाशक: साधना प्रकाशन
जातिव्यवस्था कुणालाच नको आहे, पण तिच्याविरुद्धची टिका योग्य मार्गाने करण्याची कुणाची तयारी नाही. इतरांच्या जातीवर टिका करून जाती मोडत नसतात, त्या पक्क्या होत असतात. कारण प्रत्येक जातीत तिचे अभिमानी लोक असतातच. आपापल्या जातींचा धिक्कार करून आपल्या जातीचे नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न त्या त्या जातीजमातींच्या लोकांनी केला; तर जातव्यवस्था मोडत असते.
- नरहर कुरुंदकर (जागर)
हमीद दलवाई यांच्या साहित्याचा पहिला उल्लेख वाचला तो नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकात. त्या नंतर त्यांच्यावर लिहलेले अँग्री यंग सेक्युरालिस्ट हे पुस्तक वाचनात आले. त्यात एकंदरीत त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या भूमिकेचा अंदाज आला. मग त्यांनी लिहलेले वरील पुस्तक वाचायला घेतले. सदर पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले आहे व त्याबाबत प्रस्तावनेत योग्य माहिती दिली गेली आहे.
पुस्तकाची एकंदरीत मांडणी ही भारतीय इस्लाम, त्यातील धार्मिक चळवळी, पाकिस्तानची चळवळ, भारत पाक संबंध, हिंदुत्ववाद, आणि स्वातंत्र्यतोर भारतातील काही संघटना/पक्ष यांच्या भूमिका अशी आहे.
भारतीय इस्लाम मध्ये इस्लाम चा प्रसार भारतात आणि जगभर कसा झाला यावर चिकित्सा केली आहे. यात भारतात झालेले आगमन हे हिंसक आणि व्यापार या दोन्ही प्रकारे झालं आहे असे लेखकाने काही पुरावे देऊन स्पष्ट केले आहे. यात मुस्लिम धर्मातील काही प्रथा आणि चालीरीती यावरपण चर्चा केली आहे.
यानंतर आलेल्या प्रकरणात इस्लाम मधील विविध धार्मिक चळवळी जसे की जमाते इस्लामी, जमियत ए उलेमा, अहरार, खिलाफत, इत्यादी ची जडणघडण त्यांची उद्दिष्टे याची विस्तृत चर्चा यात केली आहे. याचाच विस्तार करून पाकिस्तान विषयावर पुढील प्रकरण आहे यात मुस्लिम लीग व समकालीन काही मुस्लिम राजकीय संघटना यांची दुटप्पीपणाची भूमिका यावर विवेचन आहे. यात जीना यांची भूमिका लक्षवेधी आहे. यात धार्मिक नसणारे जीना मनाने जातीयवादी असतात आणि आपले निर्विवाद वर्चस्व मुस्लिम राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी जातीयवादाचा आधार घेताना दिसतात. याच काही प्रकरणांमध्ये जीना समर्थक आणि नेहरू-गांधीविरोधक यांनी केलेली पाकिस्तान निर्मिती आणि फाळणी संदर्भातील काही प्रचलित वक्तव्ये लेखकाने पुराव्यानिशी खोडून काढली आहे. यात जातीयवादी मुस्लिम मन कसे एका भ्रमात वावरत असते असे पटवून दिले आहे.
हिंदुत्ववाद यावर एक संपूर्ण प्रकरण आहे त्यात हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर सखोल विवेचन आहे. यातील तत्कालीन मुख्य संघटना आर्यसमाज, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची जडणघडण, त्यांची मुख्य उद्दिष्टे यांची चिकित्सा यात केली आहे. यातील मुस्लिम समाजातील जातीयवादाला धर्मनिपेक्षतेच्या चौकटीत राहून विरोध करण्याचे समर्थन केले आहे पण या चौकटीच्या बाहेरील विरोध लेखकाने चुकीचा ठरवला आहे. लेखकाच्या मते हिंदुत्ववादी, धर्मनिरपेक्षता म्हणजे मुस्लिम अनुनय असे मानतात त्यामुळे ते विरोध चौकटीच्या बाहेर जाऊन करतात आणि तो चुकीचा ठरतो.
लेखकावर RSS चा हस्तक असल्याचे आरोप मुस्लिम जातीयवादयानी केले आहे. आणि लेखकाने ते खोडून दाखवले आहे आणि यामुळे लेखकावर अलिगड विद्यापीठात हल्ला देखील झाला होता.
एकंदरीत पुस्तक वैचारिक आणि राजकीय आहे. इतिहासातील घटनांचा वेळोवेळी दाखले देऊन लेखकाने आपले विवेचन मांडले आहे. आजची सामाजिक परिस्थिती पाहता पुस्तकातील विवेचनातील मुद्दे बऱ्याच ठिकाणी अगदी तंतोतंत लागू पडतात. फाळणी व गांधी-नेहरू यांची भूमिका याबाबत आजपण ऐकू येणारी वक्तव्ये किती पोकळ आहे हे लेखकाने तेव्हाच सोदाहरण स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment