जागर

 


जागर
लेखक: नरहर कुरुंदकर
प्रकाशक: देशमुख आणि कंपनी

"जातिव्यवस्था कुणालाच नको आहे, पण तिच्याविरुद्धची टिका योग्य मार्गाने करण्याची कुणाची तयारी नाही. इतरांच्या जातीवर टिका करून जाती मोडत नसतात, त्या पक्क्या होत असतात. कारण प्रत्येक जातीत तिचे अभिमानी लोक असतातच. आपापल्या जातींचा धिक्कार करून आपल्या जातीचे नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न त्या त्या जातीजमातींच्या लोकांनी केला; तर जातव्यवस्था मोडत असते."
- नरहर कुरुंदकर (जागर)

कुरुंदकरांच्या साहित्याची ओळख यापूर्वीच झाली होती. श्रीमानयोगीची प्रस्तावना आणि शिवरात्र वाचून पूर्ण झाले. तेव्हा काही वाचकांनी जागर वाच म्हणून सुचवले. तेव्हापासून जागर वाचायची उत्सुकता होती. अखेरीस मागील पुस्तक खरेदीत जागर घरी आले. पण त्यानंतर इंग्रजी वाचन जास्त झाले त्यामुळे हे पुस्तक काही आठवडे कपाटातच होते. अखेरीस दोन आठवड्यापूर्वी वाचायला घेतलं आणि तब्बल २ आठवड्याने वाचून पूर्ण झालं. तसा माझा मराठी वाचनाचा वेग बरा आहे पण हे पुस्तक वेळ देऊन वाचण्यासारखे आहे, आणि एवढा वेळ देऊन सुद्धा काही प्रकरणे मला समजायला जड गेली. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा वाचण्याचा योग्य येणार आहेच.

जागर म्हणजे कुरुंदकरांच्या राजकीय लेखांचा एक संग्रह. सदर पुस्तकाचे ३ भागात वर्गीकरण केले आहे. पहिल्या भागात बुद्धिजीवी वर्गाचे वैफल्य, मार्क्सवाद, राष्ट्रीय एकात्मता आणि त्याचे इतिहासाशी असलेले नातं, समाजवाद आणि विकेंद्रीकरण (decentralization) या विषयांची सखोल चिकित्सा केली आहे. बुद्धिजीवी वर्ग आणि त्यांची समाजावर असणारा प्रभाव आणि त्यांचे स्वतःच्या भ्रमात राहणे हे लोकशाहीसाठी कसे घातक आहे हे कुरुंदकरांनी परखडपणे मांडले आहे. हाच वर्ग जातीच्या चौकटीतून कोणीच बाहेर पडत नाही ही तक्रार करतो पण ही बाजू स्वतः नकळत जातीच्या चौकटीत राहून करत असतो. आणि मग वैफल्य, भ्रमनिरास अशा गोष्टी बोलू लागतो.

पुढे राष्ट्रीय एकात्मता आणि इतिहासाचा अभ्यासक्रम यावर विवेचन आहे यात इतिहासाचा अभ्यास राष्ट्रीय एकात्मतेवर कसा परिणाम करतो याचे दाखले लेखकाने दिले आहे. इतिहास हा फक्त चांगल्या गोष्टींनी भरलेला कधीही नसतो. त्यात प्रत्येक व्यक्ती आणि प्रसंग यांच्या दोन बाजू अधोरेखित केल्या असतात. पण अभ्यासक्रमात त्यातील फक्त स्तुतीसुमने उधळणारा भाग घ्यायचा आणि वादातीत म्हणून इतर भाग गाळून टाकायचा; याचबरोबर इतिहासाचा अभ्यासक्रम हा एकसलग नाही, काही ठरावीक राज्ये त्यांचे राजे यांचा इतिहास आहे. प्रत्येक प्रातांचा, राज्याचा इतिहासाचा अभ्यासक्रम निराळा आहे. एवढा विरोधाभास असताना राष्ट्रीय एकात्मतेचे संगोपन कसे होणार असा विचार आपण हे विवेचन वाचताना करू लागतो.

याच भागात मार्क्सवाद, समाजवाद, आणि विकेंद्रीकरण यावर देखील लेख आहेत पण सदर लेखांचे मला एकदा वाचून आकलन फार कमी झालं त्यामुळे त्याबाबत पुन्हा लिहायचा प्रयत्न करेल.

दुसऱ्या भागामध्ये २ लेख आहेत. एक महात्मा गांधी आणि दुसरा लेख हा पंडित नेहरूंवर आहे. दोन्ही लेखामध्ये कुरुंदकरांनी दोन्ही असामान्य व्यक्तींवर चिंतन केले आहे. गांधींच्या बाबतीत बोलायचे झाले तर आपल्या समोर अहिंसेचे प्रचारक आणि एक स्वातंत्र्यसेनानी असे व्यक्तिमत्व उभे राहते पण लेखांत एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून गांधींची ओळख होते. एका बाजूला तोंडावर फटकळपणे बोलणारे भारताचे लोहपुरुष आणि दुसरीकडे अंहकेंद्री नेहरू या दोन्ही व्यक्तींवर गांधींचा कमालीचा प्रभाव होता. या व्यक्तिमत्वाचे चिंतन लेखकाने केले आहे हे करताना विविध स्वातंत्र्यपूर्व मुद्द्यांना हात घातला आहे. दुसरा लेख पंडित नेहरूंवर आहे यात एक जुने पत्रकार व त्यांनी लिहलेला "शांतिदुत नेहरू" या प्रतिमेचे खंडन कुरुंदकरांनी केले आहे. नेहरूंना शांतिदुत म्हणून त्यांचे काम एक विशिष्ट चौकटीत बसवायला लेखकाने सपशेल नाकारले आहे आणि जागोजागी विविध पुरावे देऊन मुद्दे स्पष्ट केले आहे यात स्वातंत्रोतर कालखंडातील चीनचे आणि पाकिस्तानचे आक्रमण या विषयांची सखोल चर्चा केली आहे.

तिसरा भाग हा मुख्यत्वे इस्लाम आणि भारतीय मुस्लिम या विषयांवर आहे. यात सेक्युलॅरीसम हा विषय देखील अतिशय चांगल्या प्रकारे मांडला आहे आणि हा चर्चिला जात असताना समान नागरी कायदा यावर चिकित्सा केली आहे. सदर विवेचनात मुस्लिम समाजातील कमी शिक्षणाचे प्रमाण आणि त्याचे परिणाम यावर भाष्य आहे. कुरुंदकरांच्या या लेखामध्ये त्यांचे मित्र हमीद दलवाई यांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. कारण दोन्ही लेखकांचा ओघ हा जर या समाजाला गर्तेतून वाचायचे असेल तर आत्मचिंतन आणि आधुनिक शिक्षण याला बाजूला करून जमणार नाही असे आहे.

पुस्तक चांगलेच वैचारिक आहे आणि विषयाची मांडणी मुद्देसूद असल्यामुळे कंटाळवाणे वाटत नाही. पण जर तुम्ही या वाचन प्रकारात नवीन असाल तर थोड्या हलकेफुलके वैचारिक साहित्यापासून सुरवात करून हे पुस्तक घ्या. पुस्तक जरी ७० च्या शतकातील असले तरी आतील बरीचशी विवेचने आजदेखील तंतोतंत लागू पडतात. काही मुद्दे जागतिक राजकारणाची समीकरणे बदलल्यामुळे कालबाह्य वाटू शकतात पण त्या समीकरणाचा इतिहास देखील खूप काही शिकवणारा आहे. यानंतर कुरुंदकरांचे व्यासांचे शिल्प वाचायचा विचार आहे. या छोट्याश्या समीक्षेचा शेवट पुस्तकाच्या सुरवातीला असलेल्या आणि मला आवडलेल्या एक वाक्याने करतो.

"The right to express our thoughts however means something only if we are able to have thoughts of our own."
- Erich Fromm

Comments

Popular Posts