कात्रज ते सिंहगड K2S
कात्रज ते सिंहगड (K2S)
गेली बरेच दिवस कुठेतरी भटकायचे असा विचार चालू होता. सांधण, राजगड अशा अनेक योजना बनून वेळेच्या किंवा सोबतीच्या अभावाने बारगळत होत्या. त्यात वयक्तिक आणि कार्यालयीन आयुष्यात खूप गुरफटलो होतो त्यामुळे गिरिभ्रमंती म्हणजे भगीरथ प्रयास असे झालं होते.
नवीन ठिकाणी राहायला आलेलो असल्याने आजूबाजूला देखील जास्त ओळखी नव्हत्या त्यात योगायोगाने काही उत्साही गिरीप्रेमी भेटले. त्यांनी कात्रज ते सिंहगड ची मोहीम आखली होती, त्यांनी विचारताक्षणी त्यांना येणार असे सांगितले. मग व्हाट्सएप ग्रुप वर जॉईन होण्याचे सोपस्कार पार पडले आणि पूर्वतयारी सुरु झाली.सुरवात शुक्रवारी १८ फेब्रुवारी ला करायचे ठरले.
शुक्रवारी कार्यालयीन आणि वयक्तिक कामांची (अडथळ्यांची) शर्यत पार पडून संध्याकाळी खाली जमलो. सुरवातीचे १०-१५ उत्साही इच्छुकांमधून ६ व्यक्ती येण्यास तयार झाल्या. मला जरा जास्तच उशीर झाल्याने तिघे पुढे निघाले होते. आम्ही तिघे मागाहून निघालो.
तसे (K२S) ची सुरवात कात्रज जुना बोगदा इथून होते हे मला माहिती होते आणि तिथे पोहचायला सर्वात सोपा पर्याय म्हणजे PMT ची नसरापूर किंवा त्या मार्गावर जाणारी गाडी. (No liabilities to worry about) या उक्तीप्रमाणे या ट्रेक ला स्वतःची गाडी घेऊन जाण्याचे सर्व टाळतात. कारण ट्रेक ची सुरवात आणि शेवट हा पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी होतो. असो आम्ही घराजवळून कॅब करून निघालो होतो आणि कॅब मध्ये बसल्यावर मला कळले कि आम्ही नवीन बोगद्याच्या दिशेने जाणार होतो. म्हणजे हा माझ्यासाठी पूर्णपणे नवीन मार्ग होता.
Our ride to Katraj Tunnel |
अखेरीस आम्ही नवले पूलाजवळ कॅब ची रजा घेतली आणि आमच्या उर्वरित चमू ला भेटलो. या चमू मध्ये दीपक, कौस्तुभ, रोहन, शकिब, हृषीकेश आणि मी होतो. इथून पुढे नवीन बोगद्याजवळ जाणे म्हणजे एक दिव्यच आहे. एकतर तिथे कोणतेही पब्लिक ट्रान्सपोर्ट जात नाही. आणि रिक्षा वैगरे तिथे जाण्यासाठी भरमसाठ भाडे आकारतात. आम्ही तिथेच महामार्गावर बाजूला उभ्या असलेला ट्रक ला सहज चौकशी केली कि आम्हाला नवीन बोगद्यापर्यंत सोडाल का ? त्या काकांनी हो म्हणून आमचा आनंद द्विगुनित केला. त्यांच्या गाडीत मागे उभे राहून आम्ही नवीन बोगद्यापर्यंत आलो. इथून आम्हा सर्वाना मार्ग नवीन होता. डाव्या बाजूला असलेल्या हॉटेल मध्ये थोडी रस्त्याची चौकशी केली त्यांनी तिथून असलेली पायवाट सांगितली.
त्या पायवाटेला धरून आम्ही बोगद्याच्या अलीकडून (पुण्याचा दिशेने) डाव्याबाजूकडून वरती चढायला सुरवात केली. हेडटॉर्च आणि वरती चंद्र यामुळे अंधार बिलकुल जाणवत नव्हता. रस्त्यात एक ससा झाडीत गुडूप होताना दिसला. याच पायवाटेने हळूहळू आम्ही बोगदयाच्या वरून रस्त्याच्या पालिकडे आलो. वरती डोंगरावर टॉर्च चमकत होत्या. म्हणजे आज K२S करणारे फक्त आम्ही नव्हतो. वरती एका पठारावर आलो आणि आता वरती चमकणारे टॉर्च डाव्या बाजूला दिसत होते. पठारावर पायवाट दिसत नव्हती त्यामुळे थोडा डोंगराचा अंदाज घेत आम्ही पुन्हा ट्रॅव्हर्स घेऊन डावीकडे चढायला सुरवात केली लवकरच आम्ही थोड्या वरच्या पठारावर पोहचलो इथे एक छोटेसे घर होते त्याला डावीकडे ठेऊन आम्ही समोरची टेकडी चढायला सुरवात केली आणि आम्ही पुन्हा एका पायवाटेवर आलो. त्या पायवाटेने आम्ही पुन्हा डावीकडे येऊन कात्रज सिंहगड च्या मुख्य वाटेला येऊन मिळालो.
आता काही ग्रुप मागे आणि काही पुढे दिसत होते, आपण योग्य वाटेला आलो याची खात्री करून आम्ही टेकडी चढायला सुरवात केली. काही मिनटात आम्ही वरती टेकडी वर पोहचलो. आता आम्हाला नवीन बोगद्याकडून आम्ही चढून आलेली वाट दिसत होती. नवीन बोगद्याकडून सुरवात केल्यामुळे १ टेकडी मागे पडली होती. दुसऱ्या टेकडीच्या माथ्यावर आम्ही होतो. पुण्याकडे नजर केल्यावर पूर्ण आसमंत शहरातील वेगवेगळ्या लाइट्समुळे उजळून निघाला होता. आमच्यातील काहींना फोटो घेण्याचा मोह टाळता आला नाही. राजगड ट्रेक मध्ये लेन्स चा बाजार वाजल्याने त्यानंतर नवीन लेन्स घेण्याचा योग काही आला नव्हता त्यामुळे मी आज विना कॅमेरा ट्रेक करत होतो. (One less liability to worry about 😁). इथेच आम्हाला मागून येणार ग्रुप भेटला सदर ग्रुप निगडी ज्ञानप्रबोधनीचा ग्रुप होता. त्यांना मागे टाकून आम्ही पुढे निघालो.
कात्रज ते सिंहगड ट्रेक म्हणजे ११ ते १३ टेकड्यांची मालिकाच, प्रत्येक टेकडी वरच वर चढायची आणि माथ्यावर पोहचून पुन्हा पुढे उतरायची. दूरवर सिंहगडावरचा दुःखदर्शनचा (दूरदर्शनचा) मनोरा दिशादर्शक म्ह्णून वापरायचा आणि कूच चालू ठेवायची. एकंदरीत ट्रेक तुमच्या क्षमतेची कसोटी पाहणारा आहे आणि खूपच दमवणारा आहे. मला वयक्तिक सदर वाटेबाबत काही ऐतिहासिक संदर्भ मिळाले नाही कोणाला माहिती असतील तर निश्चित कळवा.
असो आमचा ट्रेक असाच चालू राहिले २-३ टेकड्या पार केल्यावर सराव नसल्याने चढण चांगलीच अंगावर येत होती. आमचा बाकीचा ग्रुप चांगलाच कसलेला होता त्यामुळे ते पुढे सरसावत होते. थोडी विश्रांती घेण्यासाठी आम्ही ३-४ टेकड्यानंतर थांबलो मला भूक चांगलीच जाणवत होती थोडे हादडून आणि थोडी विश्रांती घेऊन आम्ही निघालो. या टेकड्यांची चढण जेवढी वरच वर आहे तेवढीच सरळसोट उतरण देखील आहे. त्यामुळे उतरताना काही ठिकाणी बेतानं उतरावे लागत होते. दूरवर दूरदर्शन चा मनोरा दिसत होता, दुसऱ्या दिवशी शिवजयंती असल्याने गडावर लागलेली गाड्यांची रांग त्यांच्या टेल लाइटमुळे सहज दिसत होती. असेच चढत उतरत आम्ही आणखी काही टेकड्या पार केल्या.
समोर एक उंचचउंच टेकडी दिसत होती तिच्यावर काही टॉर्चचा प्रकाश दिसत होता. समोरील व्यक्ती जिथे चढत होत्या दुरून ती चढण खूप सरळ वाटत होती पण जेव्हा जवळ गेलो तेव्हा आम्ही ती सहजच चढून गेलो. काही वर्षांपूर्वी उत्तराखंड मध्ये केलेला रुपकुंड ट्रेक या निमित्ताने आठवला, रुपकुंड मधील केलू विनायक हा टप्पा असाच (False Summit ) फ़ॉल्स समिट प्रकारचा आहे टेकडी चढून येईपर्यंत असे वाटते कि हि शेवटची टेकडी आहे पण वरती आल्यावर अजून एक टेकडी किंवा चढण आपल्यला आव्हान देत उभी असते.
अखेरीस आम्ही शेवटची टेकडी उतरलो पुढे अपेक्षेप्रमाणे एक टेकडी होतीच पण वाट टेकडी ला ट्रॅव्हर्स करून जाणार होती, ती वाट पकडून सागाच्या झाडांमधून आम्ही टेकडी ला वळसा घेत निघालो, हि वाट तशी जनावरांची वाट वाटत होती, तीच पकडून आम्ही अखेरीस डांबरी रस्त्याला लागलो. हा डांबरी रस्ता म्हणजे सिंहगडाकडून खेड शिवापूर कडे जाणारा रस्ता. तसा हा ट्रेक करायची माझी दुसरी वेळ होती, पाहिला प्रयत्न अर्पित आणि मी २०१९ ला केला होता तेव्हा शेवटच्या टेकडी आधी आमची वाट चुकली होती आणि पहाटे ४ वाजता आम्ही कोंडाणपूर गावात पोहचलो होतो. पण आज आम्ही बरोबर ठिकाणी पोहोचलो होतो.
बाकी शिवजयंती असल्याने पूर्ण रस्त्यावर जल्लोषाचे वातावरण होते, शिवप्रेमी गडाला भेट देण्यासाठी येत होते. आम्ही देखील त्याच डांबरी वाटेने गडाकडे कूच केली. गडाबाबत जास्त काही लिहित नाही कारण गडावर खूपच गर्दी आणि आवाज असल्याने आम्ही काही जास्त भटकंती केली नाही. वरती पोहचून एका बाजूला साफ जागा पाहून आम्ही पसरलो. सूर्योदय पाहून आणि सर्वानी घरून आणलेले पदार्थ यावर ताव मारून आम्ही परतीचा प्रवास चालू केला.
Sinhgad |
सदर ट्रेक अवघड या प्रकारात नसला तरी तुमच्या क्षमतेची कसोटी पाहणारा आहे, माझा व्यक्तिशः सराव नसल्याने मी चांगलाच दमलो होतो. पण तुमचा चालण्याचा सराव असेल तर ट्रेक बिलकुल कठीण नाही.एकदा करून पाहावा असा ट्रेक आहे.
वरील सर्व प्रकाशचित्रे दीपक, कौस्तुभ आणि शाकिब यांनी चित्रित केलेली आहेत.
Very nice
ReplyDeleteIt was wonderful experience
Very nice
ReplyDelete