बेडसे लेणी
बेडसे लेणी (Bedse Caves)
Bedse Caves |
ठिकाण: बेडसे (पवना मावळ)
काठिण्य पातळी: सोपा
मागील ट्रेक नंतर विविध कारणांमुळे जसे की लॉकडाऊन, वाढत्या उन्हामुळे पुढील ट्रेक चा काही मुहूर्त निघत नव्हता. पण नुकतेच तयार झालेले ट्रेकपूरक वातावरण देखील स्वस्थ बसून देत नव्हते. राजगड, सिंहगड, रोहिडा मध्येच काही घाटवाटा असे बेत आखत अखेरीस आम्ही काहीतरी वॉर्म अप करावा म्हणून जवळील लेण्या किंवा गुंफांना जायचा बेत नक्की केला. अनावश्यक weekend ची जत्रा सदृश्य गर्दी टाळण्यासाठी ज्या गुंफा जास्त प्रचलित नाहीत अशा निवडण्यावर जास्त कल होता. त्यात अर्पित ने Bedse Caves ला जाऊ असे सुचवले. यापूर्वी हे नाव ऐकले होते पण कधी जाणे झालं नाही. मग थोडी माहिती जमवून जायचं नक्की केलं.
रविवारी भल्या पहाटे म्हणजे आमच्या ६ ला 😅 पुण्यातून अर्पित च्या बुलेटवरून आमचा प्रवास चालू झाला. अनलॉक च्या नियमाच्या गोंधळामुळे काय चालू आणि काय बंद यात फार तफावत होता. म्हणून तिकोना बॅकप प्लान म्हणून ठरवला. वातावरण ढगाळ होते पावसाच्या सरी पडतील अशी आशा वाटत होती. आणि आम्ही जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सायकल स्वारांना मागे टाकत चाललो होतो.
बेडसे लेणी या पवना / कडधे मावळात येतात. या सह्याद्रीच्या रांगेत खूप लेण्या आहेत कार्ला, भाजे या काही प्रसिद्ध लेण्या तर बेडसे ही थोडीशी उपेक्षित, यामुळेच ही लेणी मानवी हस्तक्षेपापासून थोडी दूर आहे. कामशेत ला जुना पुणे मुंबई रस्ता सोडून पवनानगर आणि तिकोनापेठ च्या रस्त्याला आम्ही गाडी वळवली. पुढे नवीन पुणे-मुंबई महामार्गाखालून थोडे पुढे येऊन बेडसे गावाकडे जाणाऱ्या छोट्या रस्त्याला लागलो. बेडसे गाव हे मुख्य रस्त्यापासून १-२ कि.मी आत आहे. गावापासून थोड्या अंतरावर लेण्यांच्या पायऱ्या आहेत. इथे ग्रामीण टुरिझम च्या नावावर चालणारे आणि स्विमिंग पूल असणारे एक भले मोठे हॉटेल आहे.
पायऱ्यांवर अपेक्षेप्रमाणे चिटपाखरूही नव्हते. जवळच गाडी लावून पायऱ्या चढायला सुरुवात केली. पावसाच्या वातावरणामुळे निसर्गाचं हिरवीगार दुलई पांघरलेलं मोहक रूप नजरेत साठवत आम्ही एक एक पायरी चढत होतो. चढण ही सोप्या प्रकारातील आहे. पायऱ्या पण खूप चांगल्या स्थितीत आहेत त्यामुळे आम्ही थोड्या वेगातच होतो. मध्येच मोरांचे आवाज येत होते वातावरण एकंदरीत प्रसन्न होते. जवळपास ४०० पायऱ्या चढून आम्ही वरती लेण्याजवळ पोहचलो.
वरती पोहचल्यावर काही छोट्या गुंफां नजरेस पडतात. बाहेरील आवर चांगलाच मोठा आहे. आम्ही डावीकडून सुरवात केली. सुरवातीला अर्धवट कोरलेली एक लेणी आहे. त्यात स्तूपाचा वरील भाग कोरलेला आहे. पण हे काम काही पूर्ण नाही. नंतर बाजूला काही पाण्याच्या टाक्या आहे. एका टाकीवर ब्राम्ही भाषेतील काही ओळी आहेत.
उजवीकडे अजून दोन छोट्या टाक्या आणि नंतर या लेण्यातील सर्वात मोठे चैत्यगृह आहे. या गुफेची वाट थोडीशी अरुंद आहे. पण लगेचच दगडात कोरलेले ४ भव्य खांब आहे. प्रत्येक खांबावर स्त्री-पुरुषाच्या अश्वारूढ रेखीव प्रतिकृती आहे. त्याचबरोबर हत्ती, बैल आणि गाय यांची शिल्पे आहे. हे खांब चांगलेच म्हणजे २० फूट उंच आहे. पुढे लगेचच दगडात रेखीव नक्षीकाम आहे. इथेच पुन्हा उजव्या बाजूला एक ध्यान करण्यासाठी छोटी गुफा आहे त्यावर एक छोटासा शिलालेख आहे. आत प्रवेश केल्यावर विस्तिर्ण असे चैत्यगृह आहे. याच्या एका टोकाला स्तूप आणि भवताली जवळपास 26 दगडात कोरलेले खांब आहे. मी पाहिलेल्या स्तूपापैकी हा स्तूप बराचसा चांगल्या अवस्थेत आहे. या स्तूपावर यापूर्वी मी कधीही न पाहिलेली लाकडाची कमळाच्या आकाराची छत्रावली देखील शाबूत आहे.
या स्तूपाच्या बाजूला तीन खांबावर विविध चित्रे कोरली आहे. पण बहुतेक हे काम अर्धेच राहिले आहे.
चैत्यगृहातून बाहेर येऊन उजवीकडे पुन्हा एक छोटीशी गुंफा आहे. त्यातील पाणी वाहून जाण्यासाठी दगडात केलेली योजना पाहण्यासारखी आहे.
यानंतर येते ते घुमटाकार दगडात कोरलेले विहार. या विहारात छोट्या छोट्या खोल्या आहे. त्यात यात्रेकरूंना राहण्यासाठीची योजना आहे. इथे विहाराच्या एका टोकाला एक दगडात कोरलेलं काहीतरी आहे. पण James Ferguson यांच्या नोंदीमध्ये याची नोंद नाही त्यामुळे हे नंतर कोणीतरी उगीचच विद्रुपीकरण केले आहे असे वाटतं.
यानंतर उजवीकडे पुन्हा छोट्या गुफा आहेत. आणि एक पाण्याचं टाक आहे.
वैशिष्ट्य:
१. सदर लेणी इसवीसनपूर्व १ ल्या शतकात कोरली आहे
२. या लेणीच्या दर्शनी भागावर असलेले नक्षीकाम फक्त इथे आणि कार्ला, भाजे लेण्यावर पहायला मिळते
३. धनुष्यकृती विहार हे फक्त या लेणी मध्ये पहायला मिळते
४. जेम्स फर्ग्युसन यांच्या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे या लेण्यांमध्ये पूर्वी लाकुडकाम केले होते ते काळाच्या ओघात नष्ट झाले
५. स्वातंत्रपूर्व काळात एक इंग्रज अधिकारी येणार म्हणून या गुफा साफ करायला सांगितल्या होत्या, तेव्हा अतिउत्साही कार्यकर्त्यांनी या सर्व गुफाना लाल रंग दिला. त्या इंग्रज अधिकाऱ्याने नंतर सांगितले की मला आहे त्या स्वरुपात सर्व पहायचे आहे, त्याने तो रंग पुन्हा काढायला लावला आणि सर्व प्रपंचात चैत्यगृहात असलेली काही चित्रे नष्ट झाली
६. सदर लेणी मध्ये बसलेल्या घोड्याचे शिल्प आहे, पण घोडा हा कधीच बसत नसतो
७. कार्बन डेटिंग मध्ये असे दिसून आले आहे की लेण्यांचा वरचा भाग हा खालील भागापेक्षा जुना आहे म्हणजे या लेण्या वरून खाली कोरलेल्या आहेत
८. लेण्या इथेच का कोरल्या गेल्या तर येथे डोंगरावर पाणीसाठा उपलब्ध असल्याने, हि जागा निवडली गेली
या सर्व लेण्या पाहून आम्ही थोडी विश्रांती घ्यावी म्हणून जवळच एका दगडावर विसावलो. एव्हाना भूक जाणवत होती, मग आणलेले खजूर आणि इतर गोष्टीचा आस्वाद घेऊन आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यावर आम्हाला ASI चे स्थानिक लेणी संवर्धक संतोष दहिभाते भेटले गप्पाच्या ओघात त्यांनी या आणि परिसरातील इतर लेण्याबाबत खूप मोलाची माहिती दिली. त्यांनीच जवळच वाघेश्वर मंदिर आहे व ते ६ महिने धरणाच्या पाण्यात असते आणि नुकतेच पाणी कमी असल्याने बाहेर आले आहे अशी माहीत दिली.
मग त्या मंदिराला भेट देऊन आम्ही हाडशी मार्गे पुन्हा पुण्यात दाखल झालो. एकंदरीत पुण्यापासून जवळ असलेल्या या लेण्या एखाद्या सुटीच्या दिवशी कुटुंबांसोबत पाहता येण्यासारख्या आहे.
या लेण्यापाहताना एक स्वयंघोषित निसर्गप्रेमींचा ग्रुप भेटला ते जागोजागी त्यांनी आणलेल्या शितपेयांच्या बाटल्या आणि पाण्याच्या बाटल्या सोडून आले होते. अशा ठिकाणांना भेट देताना शक्यतो आपला कचरा आपणच बरोबर घेऊन चला आणि इतर कोणाचा कचरा दिसलाच तर त्यात आपला खारीचा वाटा उचला.
ता.क.: वरील पोस्ट वरील काही रंजक माहिती James Ferguson यांच्या The cave temples of India यातून घेतली आहे. आणि बरीचशी ASI चे स्थानिक लेणी संवर्धक संतोष दहीभाते यांनी आमचा उत्साह पाहून पुरवली.
Comments
Post a Comment