समांतर
समांतर
लेखक: सुहास शिरवळकर
प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन
गेली एकवर्षं हे पुस्तक माझ्याकडे होते. आज नाही उद्या करत अखेरीस या आठवड्यात तो योग आलाच. सुहास शिरवळकर अर्थात वाचकांचे सु.शी. यांचे साहित्य यापूर्वीच वाचनात आले होते जसे दुनियादारी, खजिना, पोलादी आणि इतर दारा बुलंद कथा. त्यांच्या लिखाणाबाबत वेगळे असे काय लिहणार. त्यांचं लिखाणाचे विश्वच वेगळे असते आणि वाचकाला त्या विश्वात पुस्तक संपेपर्यंत ठेवण्याचे कसब सुशी मोठ्या खुबीने करतात. दुनियदारीचे कॉलेज असो की दारा चे साम सर्व काही डोळ्यासमोर उभे राहते.
हाच अनुभव समांतर वाचताना येतो. कादंबरी गूढकथा प्रकारची आहे. कुमार महाजन या गृहस्थाच्या जीवनात लाखात एक घडणाऱ्या घटना घडत असतात त्यातच भर म्हणून त्याच्या हातच्या रेषा अगदी तंतोतंत चक्रपाणी नामक इसमाच्या हाताशी जुळतात येथून कथानक सुरू होते. पुढे दोन व्यक्ती काही वर्षांच्या फरकाने अगदी समांतर जीवन कसे जगतात यावर कथानक फिरते आणि चकित आणि थोडा भीतीदायक शेवट करून पुस्तक संपते.
सुशी नी पात्रे फार छान रंगवली आहे, वाफगावकर हे पात्र असेच नायकाकडून उपेक्षा सहन करून देखील मैत्री टिकवायचे काम या पात्राने छान केले आहे त्यामुळे पात्र लक्षात राहते. असेच चक्रपाणी हे पात्र हे पात्र शेवटपर्यंत स्वतःभोवतीचे गूढ वलय किंचितभरही कमी होऊ देत नाही. पूर्ण पुस्तकात नायकाभोवती घटना देखील आपण गूढकथा वाचतोय याची जाणीव करून देतात.
या पुस्तकाने मागील लॉकडाऊन मध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता कारण यावर आधारित एक वेबसिरीज तेव्हा रिलीज झाली होती. त्यामुळे हे पुस्तक चांगलेच प्रकाशात आले होते. हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपण्यासारखे आहे. जर तुम्ही शिरवळकरांचे वाचक असाल आणि गूढकथा आवडत असतील तर निश्चित एखाद्या सुटीच्या दिवशी वाचावं असं हलकेफुलके पुस्तक.
Comments
Post a Comment