प्रतिपश्चंद्र
प्रतिपश्चंद्र
लेखक: डॉ. प्रकाश कोयाडे
प्रकाशक: New Era Publication
गेली
बरेच दिवस ही कादंबरी खुणावत होती. अखेरीस काही आठवड्यापूर्वी ही संग्रहात
दाखल झाली. पण बाकीचे वाचन आणि काही नवीन सिरीज मध्ये वेळ गेल्यामुळे ही
कादंबरी मागे राहिली.
कालच ती वाचायला चालू केली आणि आज खाली न
ठेवता संपली देखील यातच लेखकाचं कसब आहे. रहस्य कथा या अशाच असतात वाचताना
आपल्याला गुंग करून ठेवतात आणि त्यात वेळेचं भान विसरायला लावतात. ही
कादंबरी रहस्यकथा या प्रकारातील आहे त्यामुळे इथे कथेबद्दल विस्ताराने
लिहायला मर्यादा येतात.
कथेची सुरवात आपला नायक रवी याच्या
स्वप्नाने होते. कथानक पुढे आपल्याला रायगड पासून हम्पी ची सफर करून आणते.
रहस्यकथा म्हंटले की खजिना हा ओघाने आलाच अशाच एका खजिन्याचा उल्लेख या
कथानकामध्ये होतो आणि मग चालू होते एक खजिना शोध मोहीम. त्यात आलेले विविध
अडथळे, इतिहास आणि पुराणातील संदर्भ, थरार, खलनायकाचे डावपेच आणि आपल्या
नायकाने मोठ्या कसबाने त्यावर केलेली मात.
कादंबरीची मांडणी छान
आहे एका रहस्यामधून दुसऱ्या रहस्यात होणारा प्रवास हा देखील छान गुंफला
आहे. लेखकाने पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ जुळवताना आणि एकत्र गुंफताना
चांगलीच मेहनत घेतली आहे. काही प्रसंग इतके मस्त हलकेफुलके लिहले आहे पण
काही प्रसंग हे अतिरंजित झाले आहे आणि नायकाच्या पारड्यात थोडे झुकते माप
लेखकाने टाकले असे बऱ्याचदा वाटते. पुस्तकाच्या नावाचा संदर्भ देखील
आपल्याला काही झेपला नाही.
प्रतिपश्चंद्र वाचताना दोन पुस्तकांची
आठवण येणे क्रमप्राप्त आहे, एक म्हणजे खैरनार यांचे शोध आणि दुसरे लिमये
यांचे विश्वस्त. तीनही एकाच पठडीतील आहे. त्यातल्यात्यात शोध ही प्रतिपश्चंद्र च्या कथानकाच्या जरा जास्त जवळ जाणारी आहे, पण तुलनेत मला जास्त वास्तवदर्शी
वाटली.
एकंदरीत पुस्तक रंजक आहे, रहस्यकथा मध्ये रमायला आवडतं असेल
तरच एकदा वाचावे असे पुस्तक. बाकी एक्सक्लुसिव्ही म्हणावे असे काही नाही
त्यामुळे तुम्ही रहस्यकथा सोडून दुसरेकाही वाचायला मिळणार असा विचार असेल
तर तुम्ही हे पुस्तक वगळू शकता.
Comments
Post a Comment