सांधन दरी Sandhan Valley

सांधन दरी (सांधन व्हॅली)

Sandhan Valley

ठिकाण: साम्रद
काठिण्य पातळी: कठीण (गिर्यारोहण साहित्याचा वापर अनिवार्य)

मागे उल्लेख केल्याप्रमाणे एक थोडा मोठा ट्रेक करायचा हे निश्चित झालं होतं फक्त कुठे करायचा यावर एकमत नव्हते. हरिश्चंद्रगड सुटी सोडून करायचा असे ठरले पण ऐन वेळेस तो बेत बारगळला. पुढे याच डोंगररांगेत असलेल्या रतनगड, अलंग, मदन, कुलंग आणि कळसुबाई शिखराच्या परिसरातील सांधन दरी बऱ्याच दिवसापासून खुणावत होती. यापूर्वी एकदा सांधन केली असल्याने ट्रेक चा अंदाज होताच. मग तसा कंपू जमवायला सुरवात केली.

काही ट्रेक असे असतात जे फक्त एकदा करून मन भरत नाही. सांधनचा ट्रेक हा याच प्रकारातील. मी सांधन चा ट्रेक २ वर्षापूर्वी पहिल्यांदा कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत केला होता. तो अनुभव फार भन्नाट होता. त्याच जोरावर पुन्हा सांधन आखायला घेतला. नेहमीप्रमाणे उत्साही कार्यकर्त्यांना फोन फिरवले. व्हाट्सएप ग्रुपवर विचारले आणि अन्नपूर्णा सर्किट च्या ग्रुपवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मग ४ नावं निश्चित झाली अभि, निल आणि आमचे मामा संजयराव. मामा त्यांची दणकट टाटा सफारी(रणगाडा) घेऊन येणार असे ठरले मग आम्ही जोरात तयारी चालू केली.

मागे हा ट्रेक सुटीच्या दिवशी केला होता आणि तिथे अक्षरशः जत्रा भरेल एवढी गर्दी होती. त्यामुळे आता हा ट्रेक शुक्रवारी सकाळी सुरू करायचा असे ठरले. तेथील एका स्थानिक गाईड ला आम्ही येणार याची पूर्वकल्पना देऊन आम्ही दिवस निश्चित केला. ट्रेकच्या आदल्या दिवशी आम्हाला अजून ३ सहकारी भेटले.

शुक्रवारी सकाळी लवकरच पुण्यातुन निघायचे असे ठरले कारण पुणे ते साम्रद हे अंतर सुमारे १०० किमी आहे आणि एकदा नाशिक महामार्ग सोडला की रस्ता अरुंद होतो त्यामुळे हे अंतर कापायला जवळपास ५ तास लागतात. आणि आम्ही चक्क  वेळेत निघालो साधारणतः ६ वाजेला पुण्यातून मामांच्या रणगाड्यात आमचा प्रवास चालू झाला. सरकारच्या कृपेने चाकण परिसरात नेहमीप्रमाणे सकाळी देखील ट्राफिक मिळाली. मध्ये आळेफाट्याच्यापुढे दळवी मिसळ येथे लॉकडाऊन नंतर प्रथमच मिसळीचा आस्वाद घेतला. येथून पुढे साम्रद ला जायला दोन रस्ते आहेत एक म्हणजे बोटा वरून नाशिक महामार्ग सोडून ब्राम्हणवाडा-कोतुळ मार्गे राजूर किंवा संगमनेरवरून अकोले मार्गे राजूर. राजूरवरून भंडारदरा धरणाच्या दिशेने गेले की एक वाट रतनवाडी व साम्रद कडे जाते.

Misal @ Dalavi Misal

तर आम्ही बोटा वरून जायचे निश्चित केले याच रस्त्याने पुढे जाताना वाटेत आमचे एक स्नेही भेटले व त्यांनी सक्त ताकीद दिली की गूगल मॅप चा वापर राजूर पर्यंत करू नका मागील आठवड्यात एक वाहनाचा जवळील तुटलेल्या पुलावर मॅपमुळे अपघात झाला. आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे लागेल तसे विचारत प्रवास सुरु ठेवला.

राजूर पर्यंत रस्ता व्यवस्तीत होता पुढे भंडारदराच्या दिशेने एका फाट्यावर डावीकडे वळून साम्रद चा रस्ता आहे. जागतिक दर्जाचा खराब रस्ता म्हणुन त्याच वर्णन करता येईल अशा रस्त्यावरून प्रवास करत आम्ही १ वाजेपर्यंत साम्रद ला पोहचलो. नियोजित वेळेपेक्षा 2 तास उशिराने आम्ही पोहचलो होतो. इथे स्थानिक गाईडच्या घरी सामान टाकले आणि थोडं बसून पुढे निघायचं असा बेत नक्की केला.

आम्ही ८ जणांची दोन ग्रुप मध्ये विभागणी केली. एक ग्रुप हा सांधन दरी चालून पहिल्या रॅपलिंग पॉईंट पासून मागे साम्रद ला जाणार होता आणि दुसरा पुढे रॅपलिंग करून दरीत कॅम्पिंग करून दुसऱ्या दिवशी साम्रद ला येणार होता. आम्ही चौघे (मी, अभि, निल आणि गायत्री) या ग्रुप मध्ये होतो. गाईडच्या घरी चर्चा करून रात्रीचा दरीत जेवणाचा मेनू नक्की केला. आणि लागणार सामान घेऊन चालायला सुरुवात केली. बरोबर अर्थात गाईड होताच.

वाट चांगलीच मळलेली आहे त्यामुळे दरीच्या सुरवातीला पटकन पोहचता येते. आणि मग चालू होतात अजस्त्र खडक आणि दोन्ही बाजूनी अंगावर येणारी दरीची भिंत. सुरवातीचा काही भाग पटकन चालून होण्यासारखा आहे. मागील आठवड्यात पाऊस होऊन गेल्यामुळे इथे थोडे पाणी होते. शूज ओले होऊ नये म्हणून काळजी घेत आम्ही त्यातून चालत होतो. (ज्यांनी सांधन केला आहे ते आमची ओलं न होण्याची धडपड वाचून निश्चित स्वतःशी हसत असतील. 😅). इथे दरीच्या वरच्या भिंतीवरून दरीत उतरण्यासाठी एक नवीन रॅपलिंग पॉईंट तयार केला आहे. ज्यांना ट्रेक न करता फक्त रॅपलिंग अनुभवायचे आहे त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे. तर इथे काही अतिउत्साही ट्रेकर्स ला मागे टाकून आम्ही पुढे निघालो. राजू (आमचा गाईड) च्या सांगण्याप्रमाणे आम्हाला थोडी घाई करावी लागणार होती कारण अंधार पडायच्या आत आम्हाला कम्पिंग साईट वर पोहचायचे होते.

लवकरच आम्ही सांधन ट्रेकच्या सर्वात मजेशीर स्थळावर पोहचलो इथे तुम्हाला पाण्यातून चालावं लागतं. बर पाण्याची पातळी ही केव्हा कमरेपर्यंत आणि केव्हा गळ्यापर्यंत असते. या पाण्यातुन आपली बॅग, ट्रेकिंग शूज ओले न होण्यासाठी डोक्यावर घेऊन चालावं लागते बरे त्यात खालील जमीन ही बिलकुल सपाट नाही केव्हा अचानक छोटे दगड मध्ये येतील आणि तुमचा तोल पाण्यात जाईल हे सांगता येत नाही 😂. आणि हो पाणी हे चांगलंच थंड असते . सुटीच्या दिवशी इथे चांगलीच गर्दी होत असते. आज आमचे 2 ग्रुपच इथे होते. इथे पण एक नवीन प्रकार पहायला मिळाला. इथे एक स्थानिक व्यक्ती एक मोठा थर्मोकोल चा तुकडा तराफा सारखा वापरून आपल्याला पलीकडे पोहोचवतो त्याचा तो एक ठराविक आकार घेतो. आमच्या एका ग्रुप ने या सेवेचा लाभ घेतला.

इथून पूर्ण ओलेचिंब होऊन आम्ही आमचा ट्रेक मोठ्या मोठ्या खडकामधून चालू ठेवला. इथे Quechua च्या ट्रेकिंग वेअर्स चा खूप फायदा होतो एकतर ते पटकन वाळतात आणि जास्त पाणी धरून ठेवत नाही. जस जसे पुढे जाऊ तस तसे खडक मोठे होत होते. आणि मग आम्ही दरी जिथे उघडते आणि मोठी होते तिथे पोहचलो. इथून एक भला मोठा उतार आहे अर्थात मोठ मोठ्या खडकांच्यामधून. आमच्या गाईडच्या सांगण्याप्रमाणे आमचा एक ग्रुप इथून पुन्हा साम्रद ला जाणार होता आणि एक ग्रुप खाली उतरणार होता. आम्ही या खडकामधून उतरायला सुरुवात केली. इथे एक नेहमी फसगत होते सर्विकडे उतरायला वाट सोपी आहे असे वाटते आणि त्या वाटेवर पुढे गेलो की दुसरी वाट अजून सोपी वाटायला लागते. म्हणून राजू सांगेल तसे आम्ही उतरत होतो. आणि ३० मिनिटात आम्ही पहिल्या रॅपलिंग पॉईंट जवळ पोहोचलो. इथे वाटेत काही अजस्त्र दगड आहे त्यावर किंवा बाजूला उभं राहून फोटो काढला की त्यांच्या अवढव्यतेचा अंदाज येतो.

एव्हाना चांगलीच भूक जाणवायला लागली होती. सकाळची मिसळ पोटाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात गायब झाली होती. राजूच्या म्हणण्याप्रमाने आमचे जेवण घेऊन बाळू येत होता. त्याच पहिला रॅपलिंग पॉईंट करून जेवायचे असे नियोजन होतं.


सांधन चा पहिला रॅपलिंग पॉईंट हा खूप रोमांचकारी (Thrilling) 😅 आहे. ही जवळपास ५०-६० फुटाची रॅपलिंग आहे, मागे सांधन दरी पूर्ण उघडते आणि पुढे हा रॅपलिंग पॉईंट. तर जसे मागे उल्लेख केला त्याप्रमाणे इथे सुटीच्या दिवशी अक्षरशः जत्रा भरते. सर्व हौशी मंडळी वरती दगडांवर रॅपलिंग करणाऱ्यांची मजा पाहत बसतात आणि मग मी नाही तू जा असे करत मोठा ग्रुप असेल तर इथे जवळपास १ तास लागतो.

आम्ही आज चारच जण होतो त्यात शुक्रवार त्यामुळे इथे आम्ही आणि गाईड एवढेच होतो. एव्हाना बाळू (आमचा दुसरा गाईड) आमची शिदोरी घेऊन आला होता. मग राजू ने रॅपलिंग ची रोप आणि बाकी साहित्य लावून घेतलं. पहिल्यांदा बाळू खाली उतरला. मग हर्णेस, ग्लोव्हज, शिरस्त्राण एवढे अंगावर चढवून आमच्यातले एक एक जण खाली जाणार होता. माझी काही लगेच खाली उतरायची इच्छा नव्हती. ईथे रॅपलिंग पॉईंट ला एक ओव्हरहँग आहे तिथे माझी नेहमी फसगत होते त्यामुळे मी काही पाहिले जायचा उत्साह दाखवला नाही. 😅
मग अभि, निल आणि गायत्री क्रमाक्रमाने खाली उतरले मी सर्वांचे मोबाइल मध्ये शूट काढत होतो. शेवटी मी पण एकदाच खाली उतरलो. आज काही जास्त फसगत झाली नाही 😝 राजू काही खाली येणार नव्हता त्याने एक रोप आणि बाकीचे साहित्य बाळूला दिला आणि तो वरूनच मागे निघाला इथून पूढे बाळू आमची सोबत करणार होता.

मला चांगलीच भूक लागली होती. बाळू च्या सांगण्याप्रमाणे आम्ही अजून १० मिनटं चालून जेवणार होतो. मग आम्ही ट्रेक पेटंट खाद्य म्हणजे चिक्की काढली, सर्वांनी मिळून चिक्कीचा आस्वाद घेतला आणि पुढे निघालो. 10 मिनिटे चालून बाळूने दाखवलेल्या जागी आम्ही पोहचलो बाळूने एका एकेका डब्यात बटाट्याची भाजी, लोणचे, ठेचा आणि चपात्यांची चळत आणली होती. ट्रेक आणि त्यात असे जेवण म्हणजे क्या बात. मस्तपैकी चपातीवर भाजी घेऊन जेवणावर ताव मारला. आता थोडी विश्रांति घेऊन निघालो.

आम्ही आतापर्यंत वेळेत होतो आमच्या नियोजनाप्रमाणे आम्हाला ६ पर्यंत खाली कॅम्प साईटवर पोहचायचे होते. इथून पुढे ट्रेक काही जास्त अवघड नाही पण अजून २ ठिकाणी थोडे रोप लावून उतरावे लागते. इथे एका ठिकाणी मोठ्या दगडावर झोपून सरकत खाली उतरावं लागत (इथे बाळू ने रोप लावून दिली होती खाली प्रकाशचित्र जोडले आहे) तो टप्पा पार करून आम्ही २ ऱ्या टप्प्यावर पोहचलो इथे एक उभ्या मोठ्या दगडाला बरेच दगड अडले आहे. आणि दोन दगडांच्या मध्ये छोट्या गुहे सारख्या पोकळ्या आहे. मागे आलो होतो तेव्हा असेच एका पोकळीत उतरून दुसऱ्या बाजूने बाहेर आलो होतो. आज बाळूने नवाच मार्ग दाखवला (खाली प्रकाशचित्रात बाणाने दाखवला आहे. बाणाने दाखवलेल्या पोकळीत उतरून छोट्या गुहेमधून खाली उतरायचे) तो थोडासा अवघड वाटला पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा त्यातल्या त्यात सोपा होता त्यामुळे रोप काही लावावा लागला नाही.

आता आम्ही थोडा चालायला वेग घेतला होता. कारण मोठे दगड थोडे कमी झाले होते. लवकरच आम्ही ३ ऱ्या आणि शेवटच्या रॅपलिंग पॉईंट ला पोहचलो. इथे जर पाणी असेल तर थोड वॉटरफॉल रॅपलिंग करता येत. आम्ही काही ओल होण्यात उत्सुक नव्हतो त्यामुळे बाळू ला आम्ही बाजूला रोप लावायला सांगितला. इथे आम्हाला कळलं की आणलेल्या कारबायनर पैकी एक कारबायनर थोडे बिघडले आहे. मग रॅपलिंग न करता आम्ही रोप लावून उतरायचा निर्णय घेतला. हा कार्यक्रम त्यामुळे लवकर पार पडला.

यानंतर देखील २० मिनिटे चालावं लागते आणि मग आम्ही नदीचे पात्र सारखं दिसणाऱ्या भागात आलो. इथून पूढे कॅम्प साईट हाकेच्या अंतरावर आहे. यात ६ वाजले होते अजून उजेड होताच त्यामुळे पटकन साईटवर जाऊन टेंट लावू असा विचार केला. बाळू ने ६ लोकांचा टेंट आणला होता त्याने तो आमच्या कडे दिला आणि तो जेवणाचं नियोजन करायला लागला. अभि ने टेंट लावायची जबाबदारी घेतली आणि आम्ही त्याला मदत करू लागलो. १०-१५ मिनिटात टेंट उभा राहिला. त्यात बॅग ठेऊन ( टेंट उडुन जाऊ नये म्हणून) आम्ही बाहेर बसलो.

इथे एक १४ लोकांचा ग्रुप पुण्यावरूनच आला होता. त्यांच्याशी गप्पा मारताना कळले की ते पण गर्दी टाळण्यासाठी असेच शुक्रवारी आले.
याच कॅम्प साईट वर आम्ही मागे ८ वाजता पोहचलो होतो आणि इथे टेंट ला काहीच जागा नव्हती शेवटी स्लीपिंग बॅग मोकळ्या आकाशाखाली जिथे जागा मिळेल तिथं टाकून आम्ही झोपलो होतो.😂 त्याचा धडा घेऊन हा बेत यंदा सुटीच्या दिवशी न आखायचा निर्णय घेतला.पुढच्या वेळेस थोडे अजून लवकर म्हणजे ४-५ ला इथे पोहचायचा बेत करू असे मनाशी ठरवले जेणेकरून इथला आजूबाजूचा परिसर, पाण्याचा डोह पाहता येईल आणि थोडी शेकोटीसाठी लाकडे पण गोळा करता येतील.रात्री आम्ही गप्पा मारत जेवणाची वाट पाहिली बाजूच्या ग्रुपची अंताक्षरी चालू होऊन इमली का बुटा पर्यन्त आली होती. अशा वेळेस आमच्या bmc च्या ग्रुपची आठवण प्रकर्षाने होते कारण ग्रुप मध्ये जवळपास सर्वजण गाणी तालासुरात पूर्ण म्हणण्यात तरबेज आहेत.

ही कॅम्पसाईट तिन्ही बाजूने डोंगराने वेढलेली आहे त्यामुळे अंधार चटकन पडतो. लवकरच आमचे कढी खिचडीचे जेवण आलं, शेकोटीच्या उजेडात त्यावर आडवा हात मारून आम्ही जवळच्या झऱ्याच पाणी प्यालो. आता गप्पा मारत शेकोटी जवळ येऊन बसलो एव्हाना तो दुसरा ग्रुप जेवून त्यांच्या तंबूत गुडूप झाला होता. फक्त काही सदस्य बाहेर आमच्या बरोबर बसले होते. बाहेर चांगलीच हवा सुटली होती आणि हुळूहळू अंधार कमी होऊ लागला होता आणि कारण लवकरच समजले. डोंगराच्या आडून भलामोठा चंद्र हळूहळू डोकावत होता. असा डोंगराआडूनचा चंद्रोदय यापूर्वी हिमालयात पाहिला होता अगदी तसाच सुंदर चंद्रोदय आपल्या सह्याद्रीमध्ये प्रथम पहिला.

आम्ही मंत्रमुग्ध होऊन हा सूंदर देखावा नजरेत साठवला आता संपूर्ण परिसर चंद्राच्या प्रकाशात छान नाहून निघाला होता. तिथेच मस्त शेकटीच्या बाजूला अंग टाकून आम्ही गप्पा मारत होतो. समोरील ग्रुपमधील एक व्यक्ती नुकतीच परदेशातून भारतात स्थायिक झाली होती. ती व्यक्ती आपले अनुभव सांगत होती. त्यात आमचा वेळ चांगला गेला.

आता थोडा झोपेचा अंमल येत होता. त्यामुळे आम्ही सर्व टेंट मध्ये आपापल्या स्लीपिंग बॅग मध्ये गुडूप झालो. टेंट मध्ये गेल्यावर कळलं की टेंट ची मोठ्या पडद्याची झिप फेल आहे. त्यामुळे तो पडदा सताड उघडा राहत होता आणि आत भरभरून हवा येत होती आणि टेंट चांगलाच फडफडून जणू काय फक्त आमच्या वजनामुळे जमिनीवर टिकून आहे अशी सूचना देत होता. अशाच पार्श्वसंगीतात आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो.

 रात्री अचानक जाग आली, बाहेर चांगलाच वारा होता टेंटचा पडदा नुसताच फरफरत होता. असे वाटले वाजले असतील पहाटेचे ३-४ म्हणून घड्याळ पहिले तर फक्त १२ वाजले होते म्हणजे फक्त अंदाजे २ तासात जाग आली. ज्यांनी कोणी असे रात्री मुक्कामाचे ट्रेक केले असतील त्यांना हा अनुभव नवा नसेल. मग दोन मिनटे जाग कशाने आली याचा विचार केला आणि पुन्हा स्लीपींग बॅग डोक्यावरून घट्ट केली तेवढ्यात बाजूला हालचाल झाली म्हणून निल ला विचारले तर तो म्हणे मी पण जागा आहे झोप काही आली नाही. दुसऱ्या बाजूला अभ्या ला धक्का देऊन पहिला पण महाशय घोडे-गधे बेच कर सो रहे थे. पुन्हा ५ मिनटे गप्पा मारून झोपायचा प्रयत्न केला आणि प्रयत्नांना यश आले. 

सकाळी एकदम ६ ला जाग आली अजून म्हणावं तेवढे उजाडले नव्हते म्हणून तसाच पडून राहिलो. दुसऱ्या ग्रुपच्या लोकांच्या हालचाली कानावर पडत होत्या, अंधाराचा फायदा घेऊन ते निसर्गाच्या हाकेला ओ दयायला चालले होते असे वाटत होते. शेवटी २०-३० मिनीटांनी एकदाचा टेंट च्या बाहेर आलो. बॅग ची गुंडाळी करून, खालच्या डोहातून पिण्यासाठी पाणी आणले. आमचे बाकीचे सहकारी अजून टेंट मधेच होते. सर्व बाहेर येई पर्यंत दुसऱ्या ग्रुपचा ब्रेकफास्ट उरकला होता. आम्ही सर्व बॅग भरून टेंट काढून बाळूने मॅगी आणि चहा ५ मिनटात तयार होईल असे सांगितले. आम्ही मॅगी आणि चहा हादडून निघायच्या बेतात होतो. बाळूने सांगितले तुम्ही पुढे चला मी मागून येऊन तुम्हाला गाठतो.

या कॅम्पसाईट वरून खाली उतरले कि एक आणि थोडे चालून उजवीकडे वळून दोन अशा कॅम्पसाईट आहे. याच नदीच्या पात्राने पुढे गेले डेहणे गाव लागते तेथून कसारा ला जायला जीप वैगरे ची सोय होते. याच डेहणे गावापासून जवळ वाल्मिकी आश्रम आहे आणि आजोबा शिखर आणि सीतेचा पाळणा जिथे लवकुश यांचा जन्म झाला असे स्थानिक सांगतात. बाळूने सांगितले होते कि पात्र सोडून उजवीकडे वळून कॅम्पसाईटकडे चालत रहा. आम्ही तसे मग चालत राहिलो इथून साम्रद ला जायला जी चढाई करावी लागते त्याला करोली घाट म्हणतात हे नंतर समजले. 

तशी एकंदरीत चढण हि सोप्या  प्रकारातील आहे. आम्ही झपझप अंतर कापत पुढे चाललो होतो. लवकरच पुढे गेलेल्या ग्रुपचे आवाज ऐकू येऊ लागले. तिथे पोचल्यावर कळले त्यांनी थोडा चुकीचा रस्ता निवडला होता त्यामुळे ते मागे पडले होते. एव्हाना बाळूने मागून येऊन आम्हाला गाठले. मग आम्ही त्या ग्रुप बरोबरच पुढे मार्ग आक्रमला. या घाटात २ ठिकाणी थोडे प्रस्तरारोहण करावे लागते तसे ते सोप्या स्वरूपात आहे त्यामुळे एवढे काही वाटत नाही. पण पुढच्या ग्रुप मध्ये काही लोकांनी पहिल्या स्पॉट ला वेळ घेतला. आम्ही वरती येऊन झऱ्याचे पाणी भरून पुढे निघालो. 

उजव्या बाजूला साम्रद चा अजस्त्र कोकणकडा आणि डाव्या बाजूला दरी असा नजरा डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो. पहिल्या प्रस्तरारोहणानंतर उभी चढाई आहे आणि ती चांगलीच अंगावर येते. पण ऊन एवढे नसल्याने आम्ही झपझप पुढे चाललो होतो. पुढच्या ग्रुपचे काही लोक आमची सोबत करत होते. लवकरच शेवटच्या टप्प्यावर आम्ही आलो.  इथे पण छोटे प्रस्तरारोहण आहे. पण पहिल्या च्या तुलनेत किरकोळ आहे. या नंतर आपण घाट पूर्ण चढून वरती येतो. 

येथून दोन वाटा आहेत एक झाडीतून डावीकडे साम्रद  गावाकडे जाते आणि दुसरी कोकणकड्याकडे. साम्रद ला येऊन कोकणकडा चुकवायचा म्हणजे पुण्यात येऊन दगडूशेठला भेट न देण्यासारखे आहे. तर आम्ही चौघे कोकणकड्याकडे गेलो. छान वारा होता आणि समोरील आजोबा शिखर आणि सह्याद्रीच्या रांगेत झोपलेल्या माणसाचा आकार घेतलेल्या डोंगररांगा खुणावत होत्या येथे काही फोटो काढून डोंगरात साद घातल्यावर ऐकू येणार प्रतिध्वनी (Echo) अनुभवला. 

आता मात्र थोडी भूक जाणवत होती इथून साम्रद गाव सपाटीवर १५-२० मिनिटाच्या अंतरावर आहे. गावात आल्यावर वीकएंड ला येणारी गर्दी दिसली. आमच्या दुसऱ्या टीम ने जिथे मुक्काम केला होता तिथे येऊन आम्ही आमच्या बॅग टेकवल्या. मामांनी पिठलं आणि भाकरीचे नियोजन आहे असे सांगितले. मग भूक चांगलीच खळवळली. दणकून जेवन हादडून आम्ही थोडा आराम केला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. 

वाटेत रतनवाडीत अमृतेश्वराचे अतिशय सुरेख आणि कोरीव मंदिर आहे ते आवर्जून पहा त्याबाबत पुन्हा कधीतरी रतनगड संदर्भात लिहिल. आज फक्त त्याचे काही फोटो बरोबर जोडत आहे. 

आपण कुठेही ट्रेकिंग ला जाणार असाल तर प्लास्टिक चा कमीतकमी वापर करा. आणि आपण आणलेला कचरा आपणच खाली घेऊन जा. गड, किल्ले आणि निसर्गाची काळजी घ्या.

 


 

Comments

  1. वर्णन सुंदर केले आहे. मरुस्थळाची कल्पना आणि जागा डोळ्यांपूढे उभी राहते.!
    शब्दांची गुंफण वाचणार्याची उत्सुकता वाढवणारी आहे..!

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts