तुंग-तिकोना
तुंग-तिकोना
काठिण्य पातळी: दोन्हीची मध्यम
ठिकाण: पवना मावळ (तिकोणा: तिकोनापेठ, तुंग )
मागे
केलेल्या ट्रेक नंतर एखादा मोठा ट्रेक( सांधन व्हॅली किंवा हरिशचंद्र
गड)करायचाच हे निश्चित झालं होते. त्यात सांधन करायचा हे पक्के झालं. सांधन
बाबत नंतर विस्ताराने लिहणार आहे.तर सांधनसाठी उत्साही ट्रेकर्स जमवायला
सुरवात केली होतीआणि त्या साठी अर्पित ला रात्री फोन केला. त्याने
कार्यालयीन कामामुळे जमणार नाही म्हणून सांगितले. पण फोन ठेवताना विचारले
की उद्या (२६ जानेवारी) काय प्लॅन आहे. मोकळा असशील तर जवळपास कुठे तरी
जाऊन येऊ.
वेळ तसा मोकळाच होता म्हणून मग फोनवरच आम्ही मोहीम आखायला
लागलो. राजगडला जायचे होते पण उशीर झाला असल्याने मावळात कुठेतरी जाऊ असे
ठरले. मग अर्पितनेच तुंग आणि तिकोणा सुचवले. दोन्ही गड यापूर्वी मी केले
नव्हते त्याने केले होते त्यामुळे तो निर्धास्त होता. मग मागे नियोजन
केल्याप्रमाणे २६ ला सकाळी 5-6 ला निघायचे निश्चित केले. फक्त खाण्यासाठी
पेटन्ट चिक्की काही घेता आली नाही कारण प्रत्येक महिन्याची २५ तारीख म्हणजे
पुण्यात काही दुकानांना शासकीय सुट्टी असते 😅
तर ठरल्याप्रमाणे
भल्या सकाळी अर्पितच्या बुलेटवरून आम्ही पुण्यातून निघालो. आज वेळेत 😅
निघाल्यामुळे बरेच सायकलस्वार सोमटने फाट्याच्या अलीकडेच भेटले. हवेत गारवा
होताच. तर पहिला तिकोणा करायचा ठरले.
तिकोना हा पवना मावळात आहे
आणि तसे तिथे जाण्यासाठी तसे 2-3 रस्ते आहेत. हाडशी, कामशेत आणि लोणावळा
आम्ही कामशेत मार्गे निघालो होतो. जुना मुंबई-पुणे हायवे कामशेत फाट्यावरून
सोडून पवना धरणाच्या दिशेने निघालो. वाटेत पवनानगर ला डावीकडे वळून तिकोणा
पेठ कडे पोहचलो. तिकोणापेठ हे गडाखालील गाव आहे इथे पण पे अँड पार्क आहे
आम्ही गडाजवळच्या पार्किंग मध्ये गाडी लावून गड चढायला सुरुवात केली.
गडाची
वाट चांगलीच मळलेली आहे त्यामुळे डोंगररांगेवरून चालत लवकरच पहिल्या
बुरुजापर्यंत पोहचलो. याच वाटेनें पुढे वेताळ दरवाजातून पुढे जाताना
थोड्या अंतरावर दगडात कोरलेला मोठा मारुती आहे, एकाला चापट मारण्यासाठी
उगारलेला हाथ आणि पायाखाली एक दैत्य अशी मुद्रा असलेला मारुती आहे. तिथेच
चपेटदान मारुती म्हणून एक फलक लावलेला आहे. आता पर्यंत साधी चढण असल्याने
गडमाथ्याचे अंतर लवकर कमी होत होते. पुढे डावीकडे एक मोठं पाण्याचे टाकं
लागले आणि जवळच्या गुहेत देवीची एक तांदळा आहे. स्थानिक लोक या देवीला
तुळजाई म्हणून पूजतात. इथेच उजवीकडून एक वाट गडाला येऊन मिळते ती गडाला
येण्याची अजून एक वाट आहे आहे हे नंतर कळले. इथून पुढे बालेकिल्ल्यावर
जाण्यासाठी खडी चढण आहे. ही चढण थोडीशी अवघड आणि दमछाक करणारी आहे. हि चढाई
करतांना उजवीकडे काही पाण्याची टाकं लागतात जी सुरक्षतेच्या कारणानं जाळी
लावून झाकली आहेत. हि ४० पायऱ्यांची चढाई पार करून आपण बुरुजावर येतो. इथे
पुन्हा उजवीकडे काही पाण्याची टाकं आहेत जिचे पाणी पिण्यायोग्य आहेत. इथून
पुढे एक सोपी चढाई चढून मग आम्ही गडमाथ्यावर आलो. इथे महादेवाचं
(वितंडेश्वर) मंदिर आहे यावरून तिकोन्याला वितंडगड म्हणतात.
चपेटदान मारुती |
इथे थोडं फिरून वरती प्रजासत्ताक दिन असल्याने ध्वजारोहण होणार आहे हे कळलं. आणि शिवमय वातावरणात प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा पाहता आला. हे ध्वजारोहण पाहताना शाळेतले ध्वजारोहण आणि त्यानंतर मिळणारी बिस्किटे आठवली. :) इथून गडाच्या दक्षिण टोकावरून पवना धरण आणि तुंग चे टोक दिसत होते. इथून पुढे तिथेच जायचे नियोजन असल्याने तिकोनावरून तुंग चे काहि फोटो घेतले. इथे गडावर माकडांचा फार त्रास आहे. त्यात काही स्वयंघोषित प्राणीमित्र त्यांना खायला देऊन त्यांची सवय बिघडवतात.
एव्हान १०
वाजत आले होते. मग पुढे जायचा विचार करून गड उतरायला सुरवात केली. मध्ये
थोडी विश्रांती घेऊन घरुन (चिक्की न मिळाल्याने नाईलाजाने) आणलेल्या गुड डे
वर ताव मारला. लवकरच पार्किंग मध्ये पोहचलो खालीच एका उपहारगृहात थोडे
पोहे खाऊन तुंग च्या वाटेला लागलो.
तिकोना वरून तुंग ला जावन
मार्गे निघालो. जावन पर्यंत एकच नंबर रस्ता होता, पण जावन नंतर आम्हाला
प्रश्न पडला कि कंत्राटदाराला पैसे मिळाले नाही कि साहित्य मिळालं नाही.
रस्ता म्हणायला खडी होती आणि अर्धवट खोदून ठेवलेला रस्ता. अर्पित ची बुलेट
तुंग च्या पायथ्याशी पोहचेपर्यंत लाल मातीत नाहून निघाली होती.
एव्हाना
चांगलेच ऊन झाले होते १२ वाजत आले होते. तुंग चा बालेकिल्ला उंचावरून
खुणावत होता. मग अशीच सुरवात केली, तुंग ची चढण मध्यम प्रकारची आहे बऱ्याच
ठिकाणी खडकावरून कोरलेल्या पायऱ्यांनी जावे लागले. उभी चढण पार करून पहिला
दरवाजा लागला. आतापर्यन्त ऊन खूप वाढले होते वरती गडावर नावाला देखील झाड
दिसत नव्हते म्हणून इथे दरवाज्याचा सावलीत थोडी विश्रांती घेतली. इथून काही
पाहिऱ्या चढून वरती महाद्वारातून गडावर पोहचलो इथे बरेच उध्वस्त झालेल्या
वास्तूच्या खुणा आहेत एक छोटे गणपती मंदिर देखील आहे. गणपती मंदिराच्या
मागे एक मोठं टाकं आहे त्यात बरेच पाणी आहे. याच टाक्याच्या बाजून वरती
गडाच्या वरच्या टोकावर जाण्याची वाट आहे. आतापर्यन्त उन्हामुळे फार दमछाक
झाली होती. थोडे अंतर चालून आम्ही पुढे गडाच्या सावलीत मोठी विश्रांती
घेण्याचे ठरवले. मग वाटेत एक पुण्याचा १७ जणांचा ग्रुप भेटला त्यातील काही
जण आमच्या बरोबर बसले आम्ही चांगले अर्धा तास विश्रांती घेऊन पुढे जायचा
नक्की केलं.
इथून पुढे चढण विश्रांती घेतल्याने आणि भूक जाणवत
असल्याने थोडी वेगात झाली. १५ मिनटात वरती पोहचुन तुंग वरून तिकोनाचे काही
फोटो घेतले. तुंगाई देवीचे मंदिर पाहून पुण्याच्या ग्रुप बरोबर काही फोटो
काढून आम्ही लगबगीने खाली निघालो. गडावर जास्त काही पाहण्यासारखे नाही, पण
चढण चांगली आहे. गड उतरून खाली पायथ्याशी असलेलया मंदिरात थोडे थाम्बुन
आम्ही लोणावळ्याकडे निघालो. आता परतीचा प्रवास लोणावळ्यावरून करायचे
निश्चित केलं. मग INS शिवाजी मार्गे लोणावळ्यात पोहचलो आणि जेवण करून
पुण्याकडे निघालो.
दोन्ही गड हे घाटवाटांवर आणि बोरघाटातील
वाहतुकीवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने बांधले होते. दोन्ही गड स्वराज्यात
काही काळ होते. नंतर युद्धामध्ये गडांचे नुकसान झाले. जर आकाश मोकळे असेल
तर कोरीगड, लोहगड आणि विसापूर दोन्ही गडावरून दिसतात. तिकोना करून पवना
धरणावरून लाँच ने तुंग च्या पायथ्याच्या गावाकडे जात येते. (जर लाँच चालू
असेल तर.) आम्हाला हि माहिती थोडी उशिराने समजली.
आपण जर कोणत्याही
गडावर जाणार असाल तर प्लास्टिक चा कमीत कमी वापर करा. आणि आपण आणलेला कचरा
आपणच खाली घेऊन जा. 🙏 गडाची स्वछता राखा.
Comments
Post a Comment